दिघेफळ... काळू नदीच्या काठावर माळशेज घाटाच्या खाली वसलेले एक छोटेसे गाव. ह्या गावाबद्दल माझ्या मनात खूप आठवणी कोरलेल्या आहेत. गावाबाहेरून नदी वाहते. नदीवर छोटासा बंधारा बांधून शेतीसाठी पाणी अडवलेले आहे. इथेच थोडे पुढे एक मस्त धबधबा आहे. पावसाळ्यात हा धबधबा मात्र प्रचंड मोठा होतो. एकावर्षी तर तो कैच्याकै मोठा झाला होता. अडकून पडलो होतो. संपर्कच तुटला होता बाहेरच्या जगापासून. पण सर्वत्र हिरवळ आणि निसर्ग सौंदर्य. समोरच्या टेकडीवर चढून नजर फिरवली की नाणेघाट, माळशेज घाट, कोकणकडा, आजा पर्वत आणि सीतेचा पाळणा अशी सह्याद्रीची रांग साद घालते. गावातला विठ्ठल आमचा जुना दोस्त. वयाने आमच्यापेक्षा २-३ वर्षे लहान. दरवर्षी आठवणीने दिघेफळला जावे, हातपंपावर हापसे मारत पाणी काढावे, चुलीवर जेवण बनवावे, नदीच्या पाण्यात डुंबावे, रात्री खेकडे पकडायला जावे, समोरच्या टेकडीवर फिरायला जावे असा एखादा निवांत दिवस आम्ही काही मित्र दर पावसाळ्यात अनुभवायचो. डिसेंबर लागला की एखादा दिवस टेंट घेऊन जावे आणि टेकडी खालच्या माळरानावर कॅम्पिंग करावे. अब्ज तारयांनी भरलेले आकाश डोळे भरून पाहावे. मग ते डोळे मिटून आठवणीत सामावून घ्यावे. पण आता हे सर्व आठवणीतच राहते की काय अशी परिस्थिती येऊन ठेपली आहे. अस्वस्थ... प्रचंड अस्वस्थ वाटतंय. मन आतून खातंय पण काही करू शकत नाही अशी परिस्थिती येते तेंव्हा अधिकच अस्वस्थ व्हायला होते.
गेल्या काही दिवसात एक बातमी वाचून मी प्रचंड अस्वस्थ झालोय. ती बातमी आहे काळू नदीवर बांधण्यात येणाऱ्या नव्या धरणाबद्दल. मुंबई शहराची वाढती तहान लक्ष्यात घेता नजीकच्या काळात माळशेज घाटाखालील मुरबाड तालुक्यातील काळू नदीवर लवकरच एक १२०० करोड रुपये खर्च करून एक धरण बांधले जाणार आहे. ह्या धरणामुळे ५० गावे पाण्याखाली जाणार असून त्यातील काही खापरी, हेदवली, करचोंडे, वैशाखरे, माळ, चासोळे, कुडशेत, झाडघर, भोऱ्हांडे, आवळेगाव, दिवाणपाडा, उदाळडोह, फांगणे, आंबिवली, खुटल, दिघेफळ, मोरोशी, फांगुळगव्हाण, न्याहाडी, जडई, तळेगाव, फांगलोशी, खरशेत अशी आहेत. ह्या ग्रामस्थांनी धरणाला प्रखर विरोध दर्शविला आहे. मुरबाडमध्ये एक शाई धरणाचे वाढीव काम सुरू असताना अजून एक काळू धरण प्रस्तावित झाल्याने तालुक्यातूनच ह्या प्रकल्पांना मोठा विरोध सुरू झाला आहे कारण निम्मा मुरबाड तालुका धरण ग्रस्त बनणार आहे. त्यांची चूक इतकीच आहे की त्यांच्या डोक्यावर आहे माळशेज घाट जिथून पाण्याचा मुबलक पुरवठा मुंबईला होऊ शकतो. पण मुंबईची तहान किती? दररोज ३,४५० दशलक्ष्य लिटर पाणी. हा आकडा प्रचंड मोठा आहे आणि दिवसागणिक फुगत चालला आहे. ह्याला अनधिकृतपणे वाढलेल्या झोपडपट्टीची भर आहे. त्याला काहिच धरबंध राहिलेला नाही... :(
मुंबई शहरात घरासाठी आपण पाण्यासाठी किती पैसे मोजतो? दर १००० लिटर मागे फक्त ३:५० रुपये. होय फक्त ३ रुपये ५० पैसे. खूपच स्वस्त आहे ना!!! शाळा, इस्पितळे यांना १० रुपये, तर मोठ्या हॉटेल्स आणि विमानतळ वगैरे ठिकाणी हा खर्च दर १००० लिटर मागे २५ ते ३८ रुपये असा आहे. खूपच स्वस्त नाही!!! पण हे ज्यांची जमीन जाते त्यांना किती महाग पडते हे आपल्याला कधीच लक्ष्यात येत नसते. पाण्याचा ग्लास भरून पाणी पिताना आपल्याला ह्या गोष्टीची जाणीव कधी झालेली असते का? तानसा, भातसा, वैतरणा ह्या धरणांच्या वेळी अनेक गावे विस्थापित झाली. पवना, मुळशीला तेच झाले. वैतरणा धरणाच्या वाढीचा प्रस्ताव आलेला आहे आणि त्यात शाई आणि काळू धरणामुळे अजून ५०-१०० गावे विस्थापित होतील. हे कधी थांबणार आहे का? ह्याला काही उपाय आहेत की नाही? निसर्ग संपदेचा जो र्हास होणार आहे त्याबद्दल तर बोलायलाच नको.
आपण किती जमीन पाण्याखाली घालवून, लोकांचे आणि शेतीचे नुकसान करणार आहोत हेच समजेनासे झाले आहे. खरेतर पाणी वाटप नियोजन व्यवस्थित नसल्याने, १०० हून अधिक वर्ष जुनी वाहक यंत्रणा असल्याने दरवर्षी जवळ-जवळ अर्धे पाणी वाया जाते. हे असे १२०० करोड वगैरे जुनी पाईप्स किंवा उदंचन केंद्रे वगैरे नीट करण्यावर खर्च केले तर वाया जाणारे पाणी वाचवता येईल आणि नवीन जमीन संपादन करून हे असले नवे प्रश्न उभे राहणारच नाहीत. शिवाय शहरात राहणाऱ्या प्रत्येकाने पाण्याचा वापर नीट केला तरी परिस्थितीत बराच फरक पडू शकेल. प्रामाणिकपणे सांगा आपल्यापैकी कितीजण सूचकपणे विचार करून पाणी वापरतात? मुंबई मध्ये अनेक नैसर्गिक जलस्त्रोत आहेत. पण सध्या त्या विहिरी, तळी बंद पडलेल्या आहेत. खूपच कमी ठिकाणी वापरात असतील बहुदा. पावसाचे पाणी साचवून (Harvesting) भूजल पातळी सहज वाढवता येईल. पण नाही... सर्व प्रश्न राजकीय इच्छा शक्ती नाही इथेच येऊन थांबात का? आपण स्वतः देखील असे बरेच काही करू शकतो. पाण्याची मागणी कमी झाली तर अश्या प्रकल्पांची गरज भविष्यात भासणार नाही.
मुंबई आणि उपनगरे ह्या भागाला पाणी पुरवठा करणारे अनेक जलस्त्रोत आहेत. खुद्द मुंबईमधले मिठी नदीवर बाधलेले तुलसी आणि विहार काही प्रमाणात मुंबईची तहान भागवतात. पण ते ३० वर्षांपूर्वी ठीक होते. सध्याच्या वाढीव लोकसंख्येला ते पुरून उरले नसतेच. पवई लेक मधील पाणी आता पिण्यासाठी वापरले जात नाही. ठाणे जिल्ह्यातील तानसा, अप्पर वैतरणा, लोवर वैतरणा (मोडक सागर), भातसा असे जलस्त्रोत आहेत. ह्यातही तानसाचे ४ विभाग, भातसाचे ३ विभाग आणि वैतरणाचे ३ असे उप वर्गीकरण आहे. ह्यात आता शाई आणि काळू धरणाची भर पडणार आहे. अजूनही उल्हास नदीवर लोणावळा पासून कोठेही धरण नाही. पण बहुदा मुंबई - पुणे रेल-वे मार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग जवळ असल्याने त्यावर धरण बांधण्याची योजना आखली गेली नसेल.
मुळात धरणामधून शुद्ध करून आलेले पाणी सरसकट प्रत्येक गोष्टीसाठी वापरले जाते आहे. पिण्यासाठी तर हवेच पण कपडे-भांडी धुताना, गाड्या धुताना, इतर कामांसाठी कशाला हवे हे मौल्यवान पाणी? बरे वापरले गेलेले हे पाणी सरसकट खराब असते का? उत्तर नाही असे आहे. त्यावर शुद्दीकरणाची प्रक्रिया करून त्यातील ८० टक्के पाणी इतर कामांना वापरता येऊ शकते. असा एक प्लांट मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस मध्ये कार्यरत आहे. स्टेशनचे सर्व फलाट आणि येणाऱ्या गाड्या धुण्यासाठी १९९९ मध्ये अवघ्या २४ लाख रुपयात हा प्लांट उभारला गेला. ह्यातून दररोज २ लाख लिटर पाणी शुद्ध केले जाते आणि स्टेशन परिसरात विविध कामांसाठी वापरले जाते.
शिवाय समुद्रातील खारे पाणी गोडे करून देखील वापरता येऊ शकते. बी.ए.आर.सी. मधील एक तंत्रज्ञ अरविंद देशमुख यांनी ह्या संदर्भात एक रिपोर्ट सादर केला होता. त्यात त्यांनी अवघ्या १५ करोड रुपयात असा १ प्लांट उभा करून दररोज २० दशलक्ष्य लिटर इतके पाणी शुद्ध करता येईल ह्याकडे लक्ष्य वेधले होते. असे प्लांट उभे केले तर भविष्यातील आपली पाण्याची गरज वाढली तरी त्याचा भार इतरस्त पडणार नाही आणि त्यामुळे अनेकांचे नुकसान होण्याचे टाळू शकेल. पण सध्यातरी ते अशक्य वाटतंय. म्हणजे २-३ वर्षात इथे धरण झाले की आपण मुरबाड वरून माळशेजला जाताना एक सुंदर धरण आपल्या डाव्या हाताला दिसत राहील. अप्रतीम निसर्ग वगैरे उपमा देत आपण फोटो देखील काढू... पण मुळात ज्यांची घरे जमीन अशी मालमता जाणार आहे ते मात्र तलासरीच्या एका कोपरयात कुठेतरी खितपत आयुष्य जगत असतील.
विठ्ठलसारख्या अनेकांची शेत जमीन जाणार आहे. अगदी घरासकट. तो आता ठाणे महानगर पालिकेत नोकरी मिळावी म्हणून प्रयत्न करतोय. मोठ्या मुलीला तिच्या मामाकडे म्हश्याला ठेवलंय. लहान मूलाला सुद्धा तिथेच पाठवेल बहुदा. स्वतः ठाण्यात राहायला येईल. तलासरीला जाणार नाही म्हणतो. इथे नोकरी करण्यासाठी राहील पण त्याला कुठे परवडणार आहे ठाण्यात घर घ्यायला. म्हणजे कुठल्याश्या झोपडपट्टी सदृश्य खुराड्यात राहील तो? त्याच्या मुलांचे हे हसू तसेच राहील का? हे सर्व आता मला अस्वस्थ करायला लागलंय. आधी इतकी वर्षे हेच होत आलंय. आज फक्त त्याची दाहकता जवळून जाणवते आहे इतकंच. मी काय करू शकीन? मुंबईत आलो की विठ्ठलला भेटीन. जमेल ती मदत करीन. पण आपण काय करू शकतो ह्याच्या मर्यादा आपल्यालाही ठावूक असतात... मग फक्त अस्वस्थ व्हायचे... प्रचंड अस्वस्थ... दुसरे काय!!!
आता कळलं तुझ्या बझवरच्या अस्वस्थतेचं कारण.. !!
ReplyDelete:((
खरंच ही हाव, ही तहान कुठे घेऊन जाणार आहे आपल्याला तेच कळत नाही !!
:-( :-(
ReplyDeleteशहरांची तहान भागवता भागवता अश्या अनेक गावांचा बळी गेलाय यार. समुद्राचे पाणी प्रक्रिया करून शुध्द करून वापरता येणाऱ्या प्रकल्पाला दुर्लक्ष करून अश्या अनेक गावांचे अस्तित्व कायमचे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे... काय लिहू अजुन, प्रसंगाची दाहकता दाहकपणे जाणवतेय रे :( :(
....:(
ReplyDeleteकाय करू शकतो रे रोहन आपण?? सकाळी उठून नळ सुरुच ठेऊन दात घासण्यापासून पाण्याची उधळपट्टी सुरु होते त्या साऱ्यांची तहान फक्त वाढत जाणार आहे वास्तव हेच आहे....:(
खरोखर गरज आहे आणि पाणी कमी पडत असेल तर अशा गोष्टींचा एक वेळ वेगळा विचार करू शकतो. पण त्या लोकांच्या जमीनी जाणार आपल्याला पाणी देण्याकरिता. ते ही पाणी आपण किती काटकसरीने वापरतो हाच प्रश्न आहे. शहरातही टँकरने पाणी पुरवठा करत ये जा करत असताना त्या टँकरच्या पाईप मधून पाणी गळत असते, काही वेळा तर वाहत असते.
ReplyDeleteआपल्याला मिळत आहे वापरून घ्या हा प्रकार सगळीकडेच बळावत चालला आहे आणि सगळ्याच गोष्टींमध्ये. त्याचेही वाईट वाटते. वीज हे ही त्यातच. शेकडो गावांत १५-१८ तासांचे भारनियमन करून मुंबईसारख्या शहरांना २४ तास वीजपुरवठा दिला जातो. पण तिथेही उधळपट्टीच चाललेली असते. :(
खरंच अस्वस्थ करणारे आहे सगळं. एक दिवस सगळ्याचा स्फोट होईल तेंव्हा मनुष्य प्राणी हताश होण्यापलिकडे काही करू शकणार नाही.
ReplyDeleteखरंच खूप अस्वस्थ व्हायला होतं. आपली पाण्याची तहान आणि विजेची भूक याने किती आयुष्यं देशोधडीस लागणार? पाणी आणि वीज एकूण वापराच्या निम्म्याहून अधिक वाया जातात. नियोजनाचा, दूरदृष्टीचा आणि इच्छाशक्तीचा अभाव या दोन्ही प्रश्नांमध्ये दिसून येतो. जैतापूरचं काय होतंय कोण जाणे? प्रगत राष्ट्रातील लोक अनुभवांतून शहाणे होऊन अणुउर्जा प्रकल्प पूर्णपणे बंद करताहेत. त्याउलट आपल्याकडे मृत्यु समोर दिसत असूनही नविन प्रकल्प उभारण्याचा अट्टाहास. आपल्या प्राचीन दस्ताइवजांमध्ये लिहून ठेवलंच आहे नं, "माणसाची भूक, निद्रा आणि मैथुन वाढवावी तेवढी वाढते आणि कमी करावी तेवढी कमी होते." सगळं आपल्याच हातात आहे.
ReplyDeleteपाण्याची उधळपट्टी मी बऱ्याच ठिकाणी पाहत आलोय. जरी तिथे तुम्ही कोणाला सुनावले तर उत्तर काय मिळेल.. तुम्हाला काय त्याचं? ही मनोवृत्ती मुळात ह्याच्या पाठीशी आहे..
ReplyDeleteसेनापती....पिंपळगाव जोगा धरण झाल अन मढ,सांगनोरे यासारखी गावं अन त्या सोबत तेथील एक संपुर्ण पिढी देशोधडीला लावली आहे.सुरुवातीला पिंपळजोगा धरण सुरुवातीला डिंगोरे ह्या गावाजवळ होणार होत पण काही राजकीय नेत्यांनी हस्तक्षेप करुन हे धरण पिंपळगाव जोगे येथे आणल.हे धरण होऊ नये म्हणुन मढ अन पंचक्रोशीतील नागरिकांनी आंदोलन पण केल होत.माझे मामा आजोबा यासाठी तुरुंगात पण गेले होते. पण काहीच उपयोग नाही झाला.ते आंदोलन राजकीय नेत्यांनी दाबुन टाकल.या धरणात सर्व सुपीक जमीन गेली आहे. आजोबा, आत्या यांच्या जगण्याच ते एकमेव साधन होत ते पण या धरणानं हिरावुन घेतल.पुनवर्सन झाल पण ते ही नावालाच जो मोबदला किंवा ज्या जमीनी मिळाल्या त्यांना मुलतःच कस कमी आहे तर तिथे शेती होणार तरी कशी?
ReplyDeleteमढ गाव पुर्वी पंचक्रोशीतील एक मुख्य बाजारपेठ होती तेच आज पुनर्वसनानंतर ओसाड झाल आहे.आज नवीन मढ गावात गेल की सुन्न होत.आता फ़क्त बुजुर्ग मंडळी तेवढी असतात बाकी लोक उदरनिर्वाहासाठी पुणे,मुंबई अशी पांगली आहेत. कोणी कंपनीत कंत्राटी कामगार तर कोणी ड्रायव्हर ...मिळेल ती नोकरी करुन पोट भरत आहेत.
एक धरण झाल पण त्या सोबत इतके सारे संसार उध्वस्त करु गेले :( :(
अजुन एक महत्वाच सांगायच विसरुन गेलो....आता धरण ज्या जागेवर बांधल गेल आहे ती जाग शास्त्रीय दृष्टया पुर्णतः चुकीची आहे...पण साहेबांच्या नजरेतुन तीच जागा बरोबर असल्याने हे धरण झालय. अळी मिळी गुप चिळी...कोणीच काही बोलायच नाही.
मढ हे माझ्या बाबांच्या मामाच गाव तर सांगनोरे हे माझ्या आत्याच गाव...बाबांच बालपण,बाबांची नोकरीतील सुरुवातीची १० वर्ष (खिरेश्वरला) इथेच गेली आहेत...त्यामुळे ह्या परीसराचा विषय निघाला की खुप भावनिक होतो.
खराच रे असे अस्वस्थपणा नेहमीच येतो अश्या बर्याच गोष्टी आपल्या सभोवताली घडत असतात. पण शेवटी राहते ती फ़क्त अस्वस्थता!
ReplyDeleteघरी जेवढे सांड-पाणी असते ते सगळे पाईपलाईनने एकत्र करुन बागेच्या एका कोपर्यामधे घरगुतीच बनवलेल्या फ़िल्टरने थोडे फ़िल्टर करुन तेच पाणी पुर्ण बागेला दिले जाते वडीलांनी एवढा तरी पण्याचा पुर्नवापर करुन घेतला.
नाहीतरी सगळ्यांनाच शहरांच आकर्षण आहे ... मग सगळे पळतात शहरांकडे ... निर्वासित पण तेच करतात .. आणि एक दिवस शहराचेच होतात... आणि त्याच्या बंधनात अडकून पडतात... मग पुढे वाढलेल्या संख्येसाठी परत कुठली तरी जमीन बळी... हे एक दुष्ट चक्र आहे ...
ReplyDeleteकधी गांधींच चला गावांकडे प्रत्यक्षात येणारे काय माहित
रोहन नेमकं लिहील आहेस ... फार वाईट वाटल वाचून
एक नक्की करता येईल. जयराम रमेश यांना मेल पाठवणे आणि संघटनेच्या लोकांना पाठिंब्याचे पत्र पाठवणे.
ReplyDeleteसंघटनेकडून जयराम रमेश यांना एक अर्ज पाठवण्यात आलेला आहे... आपन ह्याच ई-मेल वर आपली प्रतिक्रिया कळवू शकू.
Date: Wed, May 25, 2011 at 3:49 AM
Subject: Urgent: Illegal Work at Kalu Dam Site: Murbad, Thane
To: jairam54@gmail.com
Respected Sir,
Please find attached a representation from Shramik Mukti Sangathana
and more than 3000 tribals affected by Kalu Dam, detailing various
serious irregularities at the Kalu Dam project site in Murbad,
District Thane in Maharashtra.
Please let us know if you need a hard copy of our representation.
Please acknowledge receipt and let us know if you have any further
comments, suggestions, or follow up actions,
Looking forward to your response,
Yours Sincerely,
Adv. Indavi Tulpule
Shramik Mukti Sangathana
Murbad
मी ते ३ पानी पत्र ह्या लिंकवर चढवलेले आहे...
https://docs.google.com/document/d/1T7NAYrT3GF5SrUL3asoga_VKncRyN92a4stJ...
विश्वास पाटील यांच्या "झाडाझडती" या कादंबरीत ही धरण प्रकल्पामुळे उदध्वस्त झालेल्या शेतकरयांची विदारक स्थिती वाचावयास मिळते.ठाणे जिल्हा हा तर धरणांचा जिल्हा म्हणूनच ओळखला जातो.वैतरणा,अप्पर वैतरणा,तानसा,भातसा,चौंढे,सुर्या,धामणी,बारवी असे मोठे धरण प्रकल्प या जिल्ह्यात आहेत.लहान बंधारयांची तर गणतीच नाही.तिकडे जव्हार-मोखाड्यात पिंजाळ धरण प्रकल्प,कसारयाच्या विहीगाव जवळ वैतरणा नदीवरईल धरण,माळशेज घाटाखालचे काळू धरण असे अजून अनेक धरण प्रकल्प प्रस्तावित आहे.ही सर्व धरणे मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील बेसुमार शहरीकरण झालेल्या शहरांची पाण्याची तहान भागवण्यासाठीच बांधली जात आहेत..ठाणे जिल्ह्यातील ग्रामिण भागातील शेती आणि बागायती साठी या धरणांच्या पाण्याचा उपयोग शुन्य आहे.सुर्या आणि धामणी ही धरणं डहाणू तालूक्यात आहेत तरी ही या धरणातील पाणी पिण्यासाठी वसई-विरारला देण्यात आले आणि आमच्या डहाणू आणि पालघर तालुक्यातील जनतेला मात्र पाण्यासाठी वणवण करावी लागते.
ReplyDeleteजीवो जीवस्य जीवनम्! बळी तो कानपिळी!
ReplyDeleteह्या म्हणी पूर्वापार चालत आलेत...कारण ते तसंच होत आलंय.
फार विचार करू नका...काही कृती करता आली तर जरूर करा...अर्थात त्यालाही मर्यादा आहेतच...कारण आपला अंतरात्मा शांत झाल्याशिवाय आपण दुसर्याचा विचार करूच शकत नाही...तिथे आचार कुठून करणार!
खरं तर ह्या देहाला कितीशी जागा लागते....साडेतीन हात...पण तरीही आपण मोठमोठी घरं घेतो...अजून मोठी हवीत अशी इच्छा बाळगतोच ना...तेव्हाही कैक लोक निर्वासित आहेत/असतात हे सोयिस्करपणे विचरतोच ना...तेच इतर बाबतीत आहे...पाणी,वीज,कपडे-लत्ते आणि अनेक बाबतीत आपली भूक कधीच भागत नाही...मग काय होणार?
आज जे काही होतंय त्याला जाणता/अजाणता आपली ही भूकच कारणीभूत आहे...ही भूक कमी करण्याची,मर्यादित करण्याची काही जादू शोधा म्हणजे मग सगळं गाडं सुरळित चालायला लागेल.
:(
ReplyDeleteरोहणा खरय रे.... कुठे संपणार आहे हे सगळं... लहानसा किस्सा सांगते आम्ही रोह्याला होतो न, कंपनीच्या बिल्डींग्स होत्या आणि पाणीपट्टी नव्हती... पाण्याचा अत्यंत वायफळ वापर पाहिला आम्ही तिथे... समजावले तर एकच उत्तर आपल्याला कुठे पैसे भरायचे आहेत???
केवळ पाणीच नाही रे पण सगळ्यात बाबतीत आपली भुक किती न उधळपट्टी किती याचे विचार व्हायलाच हवेत....