Pages

31-May-2011

आपली तहान किती???


दिघेफळ... काळू नदीच्या काठावर माळशेज घाटाच्या खाली वसलेले एक छोटेसे गाव. ह्या गावाबद्दल माझ्या मनात खूप आठवणी कोरलेल्या आहेत. गावाबाहेरून नदी वाहते. नदीवर छोटासा बंधारा बांधून शेतीसाठी पाणी अडवलेले आहे. इथेच थोडे पुढे एक मस्त धबधबा आहे. पावसाळ्यात हा धबधबा मात्र प्रचंड मोठा होतो. एकावर्षी तर तो कैच्याकै मोठा झाला होता. अडकून पडलो होतो. संपर्कच तुटला होता बाहेरच्या जगापासून. पण सर्वत्र हिरवळ आणि निसर्ग सौंदर्य. समोरच्या टेकडीवर चढून नजर फिरवली की नाणेघाट, माळशेज घाट, कोकणकडा, आजा पर्वत आणि सीतेचा पाळणा अशी सह्याद्रीची रांग साद घालते. गावातला विठ्ठल आमचा जुना दोस्त. वयाने आमच्यापेक्षा २-३ वर्षे लहान. दरवर्षी आठवणीने दिघेफळला जावे, हातपंपावर हापसे मारत पाणी काढावे, चुलीवर जेवण बनवावे, नदीच्या पाण्यात डुंबावे, रात्री खेकडे पकडायला जावे, समोरच्या टेकडीवर फिरायला जावे असा एखादा निवांत दिवस आम्ही काही मित्र दर पावसाळ्यात अनुभवायचो. डिसेंबर लागला की एखादा दिवस टेंट घेऊन जावे आणि टेकडी खालच्या माळरानावर कॅम्पिंग करावे. अब्ज तारयांनी भरलेले आकाश डोळे भरून पाहावे. मग ते डोळे मिटून आठवणीत सामावून घ्यावे. पण आता हे सर्व आठवणीतच राहते की काय अशी परिस्थिती येऊन ठेपली आहे. अस्वस्थ... प्रचंड अस्वस्थ वाटतंय. मन आतून खातंय पण काही करू शकत नाही अशी परिस्थिती येते तेंव्हा अधिकच अस्वस्थ व्हायला होते.


गेल्या काही दिवसात एक बातमी वाचून मी प्रचंड अस्वस्थ झालोय. ती बातमी आहे काळू नदीवर बांधण्यात येणाऱ्या नव्या धरणाबद्दल. मुंबई शहराची वाढती तहान लक्ष्यात घेता नजीकच्या काळात माळशेज घाटाखालील मुरबाड तालुक्यातील काळू नदीवर लवकरच एक १२०० करोड रुपये खर्च करून एक धरण बांधले जाणार आहे. ह्या धरणामुळे ५० गावे पाण्याखाली जाणार असून त्यातील काही खापरी, हेदवली, करचोंडे, वैशाखरे, माळ, चासोळे, कुडशेत, झाडघर, भोऱ्हांडे, आवळेगाव, दिवाणपाडा, उदाळडोह, फांगणे, आंबिवली, खुटल, दिघेफळ, मोरोशी, फांगुळगव्हाण, न्याहाडी, जडई, तळेगाव, फांगलोशी, खरशेत अशी आहेत. ह्या ग्रामस्थांनी धरणाला प्रखर विरोध दर्शविला आहे. मुरबाडमध्ये एक शाई धरणाचे वाढीव काम सुरू असताना अजून एक काळू धरण प्रस्तावित झाल्याने तालुक्यातूनच ह्या प्रकल्पांना मोठा विरोध सुरू झाला आहे कारण निम्मा मुरबाड तालुका धरण ग्रस्त बनणार आहे. त्यांची चूक इतकीच आहे की त्यांच्या डोक्यावर आहे माळशेज घाट जिथून पाण्याचा मुबलक पुरवठा मुंबईला होऊ शकतो. पण मुंबईची तहान किती?
दररोज ३,४५० दशलक्ष्य लिटर पाणी. हा आकडा प्रचंड मोठा आहे आणि दिवसागणिक फुगत चालला आहे. ह्याला अनधिकृतपणे वाढलेल्या झोपडपट्टीची भर आहे. त्याला काहिच धरबंध राहिलेला नाही... :(

मुंबई शहरात घरासाठी आपण पाण्यासाठी किती पैसे मोजतो? दर १००० लिटर मागे फक्त  ३:५० रुपये. होय फक्त ३ रुपये ५० पैसे. खूपच स्वस्त आहे ना!!! शाळा, इस्पितळे यांना १० रुपये, तर मोठ्या हॉटेल्स आणि विमानतळ वगैरे ठिकाणी हा खर्च दर १००० लिटर मागे २५ ते ३८ रुपये असा आहे. खूपच स्वस्त नाही!!! पण हे ज्यांची जमीन जाते त्यांना किती महाग पडते हे आपल्याला कधीच लक्ष्यात येत नसते. पाण्याचा ग्लास भरून पाणी पिताना आपल्याला ह्या गोष्टीची जाणीव कधी झालेली असते का? तानसा, भातसा, वैतरणा ह्या धरणांच्या वेळी अनेक गावे विस्थापित झाली. पवना, मुळशीला तेच झाले. वैतरणा धरणाच्या वाढीचा प्रस्ताव आलेला आहे आणि त्यात शाई आणि काळू धरणामुळे अजून ५०-१०० गावे विस्थापित होतील. हे कधी थांबणार आहे का? ह्याला काही उपाय आहेत की नाही? निसर्ग संपदेचा जो र्हास होणार आहे त्याबद्दल तर बोलायलाच नको.


आपण किती जमीन पाण्याखाली घालवून, लोकांचे आणि शेतीचे नुकसान करणार आहोत हेच समजेनासे झाले आहे. खरेतर पाणी वाटप नियोजन व्यवस्थित नसल्याने, १०० हून अधिक वर्ष जुनी वाहक यंत्रणा असल्याने दरवर्षी जवळ-जवळ अर्धे पाणी वाया जाते. हे असे १२०० करोड वगैरे जुनी पाईप्स किंवा उदंचन केंद्रे वगैरे नीट करण्यावर खर्च केले तर वाया जाणारे पाणी वाचवता येईल आणि नवीन जमीन संपादन करून हे असले नवे प्रश्न उभे राहणारच नाहीत. शिवाय शहरात राहणाऱ्या प्रत्येकाने पाण्याचा वापर नीट केला तरी परिस्थितीत बराच फरक पडू शकेल. प्रामाणिकपणे सांगा आपल्यापैकी कितीजण सूचकपणे विचार करून पाणी वापरतात? मुंबई मध्ये अनेक नैसर्गिक जलस्त्रोत आहेत. पण सध्या त्या विहिरी, तळी बंद पडलेल्या आहेत. खूपच कमी ठिकाणी वापरात असतील बहुदा. पावसाचे पाणी साचवून (Harvesting)  भूजल पातळी सहज वाढवता येईल. पण नाही... सर्व प्रश्न राजकीय इच्छा शक्ती नाही इथेच येऊन थांबात का? आपण स्वतः देखील असे बरेच काही करू शकतो. पाण्याची मागणी कमी झाली तर अश्या प्रकल्पांची गरज भविष्यात भासणार नाही.


मुंबई आणि उपनगरे ह्या भागाला पाणी पुरवठा करणारे अनेक जलस्त्रोत आहेत. खुद्द मुंबईमधले मिठी नदीवर बाधलेले तुलसी आणि विहार काही प्रमाणात मुंबईची तहान भागवतात. पण ते ३० वर्षांपूर्वी ठीक होते. सध्याच्या वाढीव लोकसंख्येला ते पुरून उरले नसतेच. पवई लेक मधील पाणी आता पिण्यासाठी वापरले जात नाही. ठाणे जिल्ह्यातील तानसा, अप्पर वैतरणा, लोवर वैतरणा (मोडक सागर), भातसा असे जलस्त्रोत आहेत. ह्यातही तानसाचे ४ विभाग, भातसाचे ३ विभाग आणि वैतरणाचे ३ असे उप वर्गीकरण आहे. ह्यात आता शाई आणि काळू धरणाची भर पडणार आहे. अजूनही उल्हास नदीवर लोणावळा पासून कोठेही धरण नाही. पण बहुदा मुंबई - पुणे रेल-वे मार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग जवळ असल्याने त्यावर धरण बांधण्याची योजना आखली गेली नसेल.

मुळात धरणामधून शुद्ध करून आलेले पाणी सरसकट प्रत्येक गोष्टीसाठी वापरले जाते आहे. पिण्यासाठी तर हवेच पण कपडे-भांडी धुताना, गाड्या धुताना, इतर कामांसाठी कशाला हवे हे मौल्यवान पाणी? बरे वापरले गेलेले हे पाणी सरसकट खराब असते का? उत्तर नाही असे आहे. त्यावर शुद्दीकरणाची प्रक्रिया करून त्यातील ८० टक्के पाणी इतर कामांना वापरता येऊ शकते. असा एक प्लांट मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस मध्ये कार्यरत आहे. स्टेशनचे सर्व फलाट आणि येणाऱ्या गाड्या धुण्यासाठी १९९९ मध्ये अवघ्या २४ लाख रुपयात हा प्लांट उभारला गेला. ह्यातून दररोज २ लाख लिटर पाणी शुद्ध केले जाते आणि स्टेशन परिसरात विविध कामांसाठी वापरले जाते.शिवाय समुद्रातील खारे पाणी गोडे करून देखील वापरता येऊ शकते. बी.ए.आर.सी. मधील एक तंत्रज्ञ अरविंद देशमुख यांनी ह्या संदर्भात एक रिपोर्ट सादर केला होता. त्यात त्यांनी अवघ्या १५ करोड रुपयात असा १ प्लांट उभा करून दररोज २० दशलक्ष्य लिटर इतके पाणी शुद्ध करता येईल ह्याकडे लक्ष्य वेधले होते. असे प्लांट उभे केले तर भविष्यातील आपली पाण्याची गरज वाढली तरी त्याचा भार इतरस्त पडणार नाही आणि त्यामुळे अनेकांचे नुकसान होण्याचे टाळू शकेल. पण सध्यातरी ते अशक्य वाटतंय. म्हणजे २-३ वर्षात इथे धरण झाले की आपण मुरबाड वरून माळशेजला जाताना एक सुंदर धरण आपल्या डाव्या हाताला दिसत राहील. अप्रतीम निसर्ग वगैरे उपमा देत आपण फोटो देखील काढू... पण मुळात ज्यांची घरे जमीन अशी मालमता जाणार आहे ते मात्र तलासरीच्या एका कोपरयात कुठेतरी खितपत आयुष्य जगत असतील.


विठ्ठलसारख्या अनेकांची शेत जमीन जाणार आहे. अगदी घरासकट. तो आता ठाणे महानगर पालिकेत नोकरी मिळावी म्हणून प्रयत्न करतोय. मोठ्या मुलीला तिच्या मामाकडे म्हश्याला ठेवलंय. लहान मूलाला सुद्धा तिथेच पाठवेल बहुदा. स्वतः ठाण्यात राहायला येईल. तलासरीला जाणार नाही म्हणतो. इथे नोकरी करण्यासाठी राहील पण त्याला कुठे परवडणार आहे ठाण्यात घर घ्यायला. म्हणजे कुठल्याश्या झोपडपट्टी सदृश्य खुराड्यात राहील तो?
त्याच्या मुलांचे हे हसू तसेच राहील का? हे सर्व आता मला अस्वस्थ करायला लागलंय. आधी इतकी वर्षे हेच होत आलंय.  आज फक्त त्याची दाहकता जवळून जाणवते आहे इतकंच. मी काय करू शकीन? मुंबईत आलो की विठ्ठलला भेटीन. जमेल ती मदत करीन. पण आपण काय करू शकतो ह्याच्या मर्यादा आपल्यालाही ठावूक असतात... मग फक्त अस्वस्थ व्हायचे... प्रचंड अस्वस्थ... दुसरे काय!!!

06-May-2011

नक्षत्रवन ...

प्रत्येक चांगल्या गोष्टीला अंत असतो असे म्हणतात. खरंय ते, नाहीतर माझी इतकी मोठी सुट्टी संपली असती का.. अखेर मी पुन्हा कामावर रुजू झालोच. गेल्या ३ महिन्यात (साडेतीन.. उगाच खोटे कशाला बोला) मस्तपैकी आराम झाला. तसे थोडे फिरणेही झालेच. मार्च महिन्यात कोकणात थोडी भटकंती झाली तेंव्हा गुहागर आणि दापोलीला गेलो होतो. दापोलीला ते कृषी विद्यापीठ आहे ना तिथे. तिथे त्यांच्या वनशास्त्र महाविद्यालयाचे नक्षत्रवृक्षांचे वन पहिले. मस्त आहे. बरीच माहिती नव्याने मिळाली.

मला तर ठावूकच नव्हते की प्रत्येक नक्षत्राचा एक स्वामी वृक्ष असतो. प्रत्येकाने स्वतःच्या राशी नक्षत्राचे झाड लावावे, त्याचे पूजन करावे आणि सानिध्यात राहावे असे म्हटले जाते. तिथे दिलेल्या माहितीप्रमाणे २७ नक्षत्रांचे स्वामी वृक्ष खालीलप्रमाणे...

मृगशीर्ष -  खैर
पुनर्वसू - वेळू उर्फ बांबू
आद्रा - अर्जुन
रोहिणी - जांभूळ
आश्लेषा - नागचाफा
पुष्य - पिंपळ
पूर्वा - पळस
मघा - वड
हस्त - जाई
उत्तरा - पायरी
चित्र - बेल
अनुराधा - केवडा
स्वाती - अर्जुन
मूळ - साल
जेष्ठा - सावर
पुर्वाशाढा - वेत
श्रावण - रुई
धनिष्ठा - शमी
शततारका - कदंब
पूर्व भाद्रपदा - आंबा  
उत्तर भाद्रपदा - कडूनिंब
रेवती - मोहं
अश्विनी - कुचला
भरणी - आवळा
कृतिका - उंबर
पूर्व फाल्गुनी - पळस
विशाखा - नागकेशर

ही सर्व झाडे विद्यापीठात विक्रीसाठी पूर्णवेळ उपलब्ध असतात. तर मग कधी वृक्षारोपण करताय आपल्या नक्षत्राच्या स्वामीवृक्षाचे??? वाढदिवसाला गिफ्ट काय देऊ असा विचार येणाऱ्या लोकांना एक चांगला पर्याय आहे... नाही का!!! तेवढंच वृक्षारोपणाचे सत्कर्म... :)