बऱ्याचदा निवांत बसलेलो असताना अचानक कुठूनशी एखादी आठवण येते आणि मन सैरभैर करून जाते. हो नं.. आठवणी आल्या की त्या काय सहजासहजी थोडीच थांबतात. एकामागून एक अश्या येतच जातात आणि मग निर्माण करून ठेवतात मनावर एक ठसा. पुन्हा एक नवीन आठवण. आयुष्यात प्रत्येक क्षणी आपल्यासमोर आलेल्या प्रसंगांच्या आठवणींची एक-एक पानं आपण जपून ठेवतो आणि मग ते एक-एक पान हळुवारपणे आपण उलगडू लागतो. लहानपणापासून आपण जिथे वाढलो, लहानाचे मोठे झालो, आपले आई-वडील, आपले पहिले राहते घर, आपली शाळा, लहानपणीचे मित्र - मैत्रिणी, प्रेम, आयुष्यात आलेला तो प्रत्येक क्षण आपण भरभरून जगलेलो आहोत हे आता आपण मोठे झाल्यावर हळूहळू लक्ष्यात येते. मग आपण आठवणी जागवू लागलो. लहानपणी भरभर मोठे व्हायचे असते आणि मोठे झालो की 'लहानपण देगा देवा' म्हणत आपण दिवस काढतो...
अश्याच काही आठवणी मी आता ह्या ब्लॉगद्वारे तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे. ह्यात सर्व काही असेल... माझे लहानपणीचे धमाल किस्से असतील. कैच्याकै लिखाण असेल, आवरा लिखाण पण असेल, धमाल - मज्जा - मस्ती असे सर्व-सर्व असेल. सोबत माझी विविध विषयांवरील मते असतील जी मी आत्तापर्यंत मांडायचे टाळत आलोय. शुभेच्छा असतील, खादाडी असेल आणि विचारमंथन पण असेल.. माझ्या आयुष्यावर प्रभाव सोडून गेलेल्या, भावलेल्या व्यक्तींचे चित्रण असेल, एखादी कथा किंवा ललित आलेच तरी दचकू नका हा.. :)
ह्या सर्व अनुभवांमधून मी थोडा घडलोय... आणि थोडा बिघडलोय... शेवटी आयुष्य म्हणजे काय.. 'परिपूर्णतेकडे चालू असलेली एक वाटचाल'. हा ब्लॉग सुद्धा त्याचाच एक भाग असे समजून पुढे सरकतोय... मला खात्री आहे आजवर माझ्या इतिहास आणि भटकंती लिखाणाला जसा प्रतिसाद आपण दिलात तसाच प्रतिसाद आत्ता सुद्धा द्याल.
