Pages

22 Jun 2012

२३ जून १९८५ : कनिष्क - एअर इंडिया फ्लाईट १८२...


एअर इंडिया फ्लाईट १८२ चा शेवटचा फोटो..


२३ जुन १९८५. आजपासुन बरोबर २७ वर्षापुर्वी एअर इंडिया फ्लाईट १८२ उर्फ एम्पेरर कनिष्कला (बोईंग ७४७) आयरिश समुद्राच्या हद्दीत ३१,००० फुटांवर बॉम्बने उडवुन देण्यात आले होते ज्यात सर्वच्यासर्व ३२९ प्रवासी मारले गेले होते. यात ३०२ प्रवासी आणि २७ कर्मचारी होते. मरणार्‍यांत २८० कॅनडियन, २७ ब्रिटिश आणि २२ भारतीय नागरिकांचा समावेश होता. सामानात असलेल्या एका बॅगमध्ये हा ब्लास्ट झाल्याने विमान हवेतच फुटले. मुळात प्रवासी विमानात चढला नसताना त्यांचे सामान विमानात का चढवले गेले हा मुख्य प्रश्न आजही अनुत्तरित राहतो. ही फ्लाईट माँट्रेयल वरुन लंडन मार्गे दिल्ली येथे जात होती. ह्यामागे बब्बर खालसा म्हणजेच खलिस्थान मुव्हमेंट्चा हात सिद्ध झाला आणि त्या संबंधीत ट्रायल्स २७ वर्षानंतर अजुनही कॅनडामध्ये सुरु आहेत. ही कॅनडामधील सर्वात खर्चिक केस ठरली असुन ह्यावर आतापर्यंत १३० मिलियन कॅनडियन डॉलर खर्च झाले आहेत. ९/११ सोडले तर आतापर्यंत झालेल्या सर्व विमान अपघातांमध्ये हा सर्वात भयानक आणि भीषण घातकी हल्ला होता. आयरिश समुद्रात इतरस्र विखुरलेले विमानाचे उरले सुरले  अवशेष ज्या जहाजाला प्रथम दिसले ते म्हणजे ल्युरेण्टियन फॉरेस्ट. (Laurentian Forest)

दुसरीकडे जपानच्या नरिता विमानतळावर अजुन एक बॉम्बब्लास्ट झाला होता जो खरेतर एअर इंडिया फ्लाईट ३०१ उडवण्यासाठी ठेवण्यात आला होता. सुदैवाने विमानतळावर ब्लास्ट झाल्याने प्रवाशी सुखरुप राहिले पण दुर्दैवाने सामान हाताळणारे २ कर्मचारी म्रुत्युमुखी पडले. 

मला ह्या प्रसंगाबद्दल लिहावेसे का वाटले किंवा अधिक माहिती करुन का घ्याविशी वाटली ह्यामागे कारण म्हणजे बॉब. बॉबला मी गेल्यावर्षी दुबईमध्ये भेटलो होतो. माझ्या नव्या कंपनीत तोही माझ्यासारखाच नव्याने दाखल झाला होता. मला भेटताच पहिल्याच दिवशी त्याने ह्या हल्ल्याचा उल्लेख केला. प्रामाणिकपणे सांगायचे तर मला ह्या अपघाताबद्दल 'असा अपघात झाला होता' ह्या व्यतिरिक्त काहीही ठावुक नव्हते.  बॉब मुळचा आयरिश आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ज्यावेळी ल्युरेण्टियन फॉरेस्टने विमानाचे अवशेष पाहिले तेंव्हा तो त्या बोटीवर होता. त्यावेळी तो अवघ्या २२ वर्षाचा होता. आज २७ वर्षांनी ४९ वर्षाचा बॉब मला त्या दिवशी जे पाहिले ते सांगत होता. 

'३२९ पैकी फक्त १३२ म्रुतदेह हाती लागले ते सुद्धा ल्युरेण्टियन फॉरेस्टने त्वरित हालचाल केली म्हणुन. बाकी १९७ म्रुतदेह समुद्रात बुडाल्याने हाती लागले नाहीत. मिळालेले बहुतेक म्रुतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आम्ही कसे उचलुन आणले हे आमचे आम्हालाच ठावुक. काहींची फक्त धडेच होती तर काही फक्त हात-पाय. समुद्रावर तरंगणार्‍या अनेक प्रेतांवर समुद्री पक्षी तुटुन पडले होते. हे सर्व घेउन आम्ही किनार्‍यावर गेलो ते गाव होते बॅन्ट्री. आम्हाला 'बॅन्ट्री' (Bantry) मधल्या लोकांनी खुप मदत केली.'कॅनडा सरकरने बॅन्ट्री येथे उभारलेले स्मारक.

जिथे मला ऐकतानाच कसेसे होत होते (आणि तुम्हाला नक्कीच वाचताना होईल) तिथे बॉब आणि ल्युरेण्टियन फॉरेस्टच्या क्रुने हे काम कसे केले असेल ठावुक नाही. विमानाचे बुडालेले अवशेष शोधुन वर काढण्यासाठी गार्डलाईन लोकेटर (Guardline Locator) ह्या ब्रिटिश आणि लिओन थेवेनिन (Léon Thévenin) या फ्रेंच बोटीला पाचारण करण्यात आले. त्यांचे मुख्य काम होते flight data recorder (FDR) आणि cockpit voice recorder (CVR) शोधणे. १६ दिवस अथक शोध घेतल्यावर अखेर एके ठिकाणी ६,७०० फुट खोलीवर विमानाचे अवशेष सापडले. दुसरीकडे जपानच्या कॅनडामध्ये २४ जुन पासुनच तपासाला वेग आलेला होता आणि संशयाची सुई थेट बब्बर खालसाकडे वळली होती. ब्लास्ट एका सानयो स्टिरिओ वापरुन केल्याचे तपासात उघड झाल्यवर तपासाची चक्रे अजुन वेगाने फिरु लागली आणि काही दिवसात ईंद्रजित सिंग रेयात याला सी.एस.आय.एस.ने Canadian Security Intelligence Service (CSIS) ब्रिटिश कोलंबिया मधुन अटक केली.

ह्या सर्वाची सुरुवात ३-६ जुन १९८४ रोजी अमृतसर येथे जे काही घडले तिथुनच झाली होती. ऑपरेशन ब्लु स्टार. त्यानंतर ४ महिन्यात इंदिरा गांधी यांची हत्या आणि शीख विरोधी दंगली याने फक्त भारतात नव्हे तर कॅनडामध्ये देखील वातावरण तंग झाले. अजितसिंग आणि परमार अमेरिका-कॅनडा येथे एकत्र आले. ह्या दोघांनी संपुर्ण कॅनडामध्ये फिरुन प्रचार करुन पैसे उभे केले आणि शीख समुदायाला भारत सरकार विरुद्ध लढण्यास उभे केले. दोघांनी काही महिन्यात २००,००० कॅनडियन डॉलर उभे केले आणि रेयातला सोबत घेउन बॉम्ब बनवायला सुरुवात केली.

१९८१ साली परमार २ पंजाब पोलिस ऑफिसर्सना मारुन कॅनडा येथे पळुन गेला होता. त्याच्या आमच्या ताब्यात द्यावे ही भारताची मागणी कॅनडाने फेटाळली होती. भारताने मग त्यावर इंटरपोल मार्फत दबाव टाकायला सुरुवात केली. १९८२ साली त्याला अवैधरित्या जर्मनीमध्ये शिरताना अटक झाली आणि १ वर्षाची शिक्षा भोगल्यावर त्याची रवानगी पुन्हा भारताऐवजी कॅनडाला केली गेली होती.

********************

अजित सिंग बाग्री (ह्याने १९८४ साली न्युयोर्क येथे झालेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय शीख परिषदेत 'हिंदुंनी कैक शिखांना नाहक ठार मारले आहे. आम्ही ५० हजार हिंदु मारत नाही तोवर शांत बसणार नाही.' असा सज्जड दम भारत सरकारला दिला होता.)

तलविंदरसिंग परमार (हा कॅनडामध्ये बब्बर खालसाचा प्रमुख होता)

लखबिरसिंग ब्रार रोडे (हा ईंटरनॅशनल सिख युथ फेडरेशन संस्था चालवत होता आणि ह्या हल्ल्या मागचा मास्टर माईंड समजला जातो). लखबिरसिंग हा जरनैल सिंग भिंद्रावाले याचा भाचा.

हरदयालसिंग जोहाल (तलविंदरसिंग परमारचा उजवा हात. विमानाचे तिकिटे ह्याचा फोन नंबर देउन बुक केली गेली होती.)

दलजित संधु

मनमोहन सिंग (तलविंदरसिंग परमारचा डावा हात. )

स्रुजन सिंग गिल. (आयत्यावेळी ऑपरेशन मधुन हात काढुन घेउन लंडन येथे पळुन गेला)

रिपुदमनसिंग मलिक

************************

रिपुदमनसिंग मलिक आणि अजित सिंग बाग्री यांना कॅनडा सरकारने २००० साली (घातपाताच्या १५ वर्षांनी) अटक केली आणि २००५ मध्ये म्हणजे ५ वर्षांनी त्यांना पुराव्याअभावी सोडुन दिले. मलिक आणि बाग्री यांनी कॅनडा सरकारवरच मानहानीचा दावा ठोकत अनुक्रमे ६.४ मिलियन आणि ९.७ मिलियन कॅनडियन डोलरची मागणी केली आहे.

ट्रायलमध्ये ईंद्रजित सिंग रेयात याने मी परमारला ओळखत नाही असे सांगितले होते पण CSIS कडे दोघांना एकत्र पाहिल्याचे पुरावे होते. मुळात परमारने रेयातला बॉम्ब बनवण्यासाठी योजले होते. ह्यानंतरही भक्कम पुरावे न मिळाल्याने CSIS कोणालाही अटक करुन ठेवु शकले नाही. रेयात कॅनडा सोडुन ईंग्लंड मध्ये निघुन गेला जिथे तो जॅग्वार कंपनीत कामाला लागला. २ वर्षांनी त्याला पुन्हा कॅनडामध्ये आणुन त्याच्यावर केस सुरु केली गेली. १९९१ मध्ये त्याला फक्त १० वर्षाची शिक्षा झाली. २००१ साली तुरुंगातुन सुटल्यावर त्याच्यावर पुन्हा केस उभी करुन त्याला ५ वर्षांकरिता पुन्हा जेल मध्ये टाकले गेले. त्याच्यावर विविध गुन्ह्यांसाठी एका मागुन एक केसेस केल्या गेल्या. गेल्या वर्षी म्हणजे ७-१-२०११ रोजी त्याला पुन्हा ९ वर्षांकरिता जेल मध्ये टाकले गेले आहे.

परमार कॅनडा मधुन गायब झाला तो कुठे गेला त्याचा पत्ता कोणालाच लागला नाही. तो पाकिस्तानात लपुन भारताविरुद्ध नव्या योजना आखत आहे अशी गुप्त बातमी १९८८ मध्ये मिळाली होती. १९९२ मध्ये अचानक पंजाबमध्ये तो पोलिस चकमकीत मारला गेल्याची बातमी आली. तो भारतात कसा आला, कधी आला, त्याला जिवंत पकडायचे प्रयत्न का केले गेले नाही याची उत्तरे अर्थात गुलद्स्त्यातच आहेत. म्रुत्युपुर्वी परमारने  Punjab Human Rights Organisation (PHRO)ला दिलेल्या एका ईंटरव्ह्युमध्ये म्हटले आहे की, लखबिर सिंग ब्रार, ईंद्रजित सिंग रेयात आणि मनजितसिंग (हे नाव वरच्या यादीतही नाहिये) यांनी कट रचला आणि २ विमानांमध्ये बॉम्ब ठेवले. लखबिरसिंग याने व्हँकुव्हर - टोकयो - बँगकॉक याचे तिकिट घेउन त्यात बॅग ठेवली तर मनजितसिंगने माँट्रेयल - लंडन - दिल्ली विमानात बॅग ठेवली.

लखबिरसिंगला १९९८ मध्ये नेपाळमध्ये २० किलो आर.डी.एक्स. बाळगल्यावरुन अटक झाली. त्यावेळी याला भारताच्या ताब्यात का घेतले गेले नाही माहित नाही पण २००१ साली तो पुन्हा पाकिस्तानात आहे याची पक्की बातमी आली. आज तो कुठे आहे याची माहिती नाही. असेही एक मत होते की हे सर्व त्यावेळच्या काँग्रेस सरकारने शीख समुदायाविरुद्ध जागतिक मत तयार व्हावे म्हणुन हे नाटक रचले. खुद्द लखबिरसिंग हा रॉ (RAW)चा अंडर कव्हर एजंट होता आणि त्याला वाचवण्यासाठी १९९२ मध्ये परमारला ठार मारले गेले.

आज २७ वर्षांनी देखील अनेक गोष्टी गुलदस्त्यातच आहेत.

बॉब म्हणतो तेच बरोबर असावे... लुक्स लाईक ईट्स ऑल डर्टी पॉलिटिक्स... 

त्या घटनेत मृत पावलेल्या सर्व ३२९ व्यक्तींना मनःपुर्वक श्रद्धांजली...


स्टॅनली पार्क, व्हँकुव्हर येथील स्मारक... म्रुत्युमुखी पडलेले बहुतेक प्रवाशी ह्या शहरातील होते.


टोरँटो येथील स्मारक...

माहिती आणि फोटो.... विकिपेडियावरुन साभार.................

1 comment:

  1. सत्य हे कल्पनेपेक्षा अकल्पित असते.

    ReplyDelete

प्रतिक्रियेसाठी धन्यवाद... आपली टिप्पणी लवकरच प्रकाशित केली जाईल...