Pages

22 Jun 2012

२३ जून १९८५ : कनिष्क - एअर इंडिया फ्लाईट १८२...


एअर इंडिया फ्लाईट १८२ चा शेवटचा फोटो..


२३ जुन १९८५. आजपासुन बरोबर २७ वर्षापुर्वी एअर इंडिया फ्लाईट १८२ उर्फ एम्पेरर कनिष्कला (बोईंग ७४७) आयरिश समुद्राच्या हद्दीत ३१,००० फुटांवर बॉम्बने उडवुन देण्यात आले होते ज्यात सर्वच्यासर्व ३२९ प्रवासी मारले गेले होते. यात ३०२ प्रवासी आणि २७ कर्मचारी होते. मरणार्‍यांत २८० कॅनडियन, २७ ब्रिटिश आणि २२ भारतीय नागरिकांचा समावेश होता. सामानात असलेल्या एका बॅगमध्ये हा ब्लास्ट झाल्याने विमान हवेतच फुटले. मुळात प्रवासी विमानात चढला नसताना त्यांचे सामान विमानात का चढवले गेले हा मुख्य प्रश्न आजही अनुत्तरित राहतो. ही फ्लाईट माँट्रेयल वरुन लंडन मार्गे दिल्ली येथे जात होती. ह्यामागे बब्बर खालसा म्हणजेच खलिस्थान मुव्हमेंट्चा हात सिद्ध झाला आणि त्या संबंधीत ट्रायल्स २७ वर्षानंतर अजुनही कॅनडामध्ये सुरु आहेत. ही कॅनडामधील सर्वात खर्चिक केस ठरली असुन ह्यावर आतापर्यंत १३० मिलियन कॅनडियन डॉलर खर्च झाले आहेत. ९/११ सोडले तर आतापर्यंत झालेल्या सर्व विमान अपघातांमध्ये हा सर्वात भयानक आणि भीषण घातकी हल्ला होता. आयरिश समुद्रात इतरस्र विखुरलेले विमानाचे उरले सुरले  अवशेष ज्या जहाजाला प्रथम दिसले ते म्हणजे ल्युरेण्टियन फॉरेस्ट. (Laurentian Forest)

दुसरीकडे जपानच्या नरिता विमानतळावर अजुन एक बॉम्बब्लास्ट झाला होता जो खरेतर एअर इंडिया फ्लाईट ३०१ उडवण्यासाठी ठेवण्यात आला होता. सुदैवाने विमानतळावर ब्लास्ट झाल्याने प्रवाशी सुखरुप राहिले पण दुर्दैवाने सामान हाताळणारे २ कर्मचारी म्रुत्युमुखी पडले. 

मला ह्या प्रसंगाबद्दल लिहावेसे का वाटले किंवा अधिक माहिती करुन का घ्याविशी वाटली ह्यामागे कारण म्हणजे बॉब. बॉबला मी गेल्यावर्षी दुबईमध्ये भेटलो होतो. माझ्या नव्या कंपनीत तोही माझ्यासारखाच नव्याने दाखल झाला होता. मला भेटताच पहिल्याच दिवशी त्याने ह्या हल्ल्याचा उल्लेख केला. प्रामाणिकपणे सांगायचे तर मला ह्या अपघाताबद्दल 'असा अपघात झाला होता' ह्या व्यतिरिक्त काहीही ठावुक नव्हते.  बॉब मुळचा आयरिश आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ज्यावेळी ल्युरेण्टियन फॉरेस्टने विमानाचे अवशेष पाहिले तेंव्हा तो त्या बोटीवर होता. त्यावेळी तो अवघ्या २२ वर्षाचा होता. आज २७ वर्षांनी ४९ वर्षाचा बॉब मला त्या दिवशी जे पाहिले ते सांगत होता. 

'३२९ पैकी फक्त १३२ म्रुतदेह हाती लागले ते सुद्धा ल्युरेण्टियन फॉरेस्टने त्वरित हालचाल केली म्हणुन. बाकी १९७ म्रुतदेह समुद्रात बुडाल्याने हाती लागले नाहीत. मिळालेले बहुतेक म्रुतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आम्ही कसे उचलुन आणले हे आमचे आम्हालाच ठावुक. काहींची फक्त धडेच होती तर काही फक्त हात-पाय. समुद्रावर तरंगणार्‍या अनेक प्रेतांवर समुद्री पक्षी तुटुन पडले होते. हे सर्व घेउन आम्ही किनार्‍यावर गेलो ते गाव होते बॅन्ट्री. आम्हाला 'बॅन्ट्री' (Bantry) मधल्या लोकांनी खुप मदत केली.'



कॅनडा सरकरने बॅन्ट्री येथे उभारलेले स्मारक.

जिथे मला ऐकतानाच कसेसे होत होते (आणि तुम्हाला नक्कीच वाचताना होईल) तिथे बॉब आणि ल्युरेण्टियन फॉरेस्टच्या क्रुने हे काम कसे केले असेल ठावुक नाही. विमानाचे बुडालेले अवशेष शोधुन वर काढण्यासाठी गार्डलाईन लोकेटर (Guardline Locator) ह्या ब्रिटिश आणि लिओन थेवेनिन (Léon Thévenin) या फ्रेंच बोटीला पाचारण करण्यात आले. त्यांचे मुख्य काम होते flight data recorder (FDR) आणि cockpit voice recorder (CVR) शोधणे. १६ दिवस अथक शोध घेतल्यावर अखेर एके ठिकाणी ६,७०० फुट खोलीवर विमानाचे अवशेष सापडले. दुसरीकडे जपानच्या कॅनडामध्ये २४ जुन पासुनच तपासाला वेग आलेला होता आणि संशयाची सुई थेट बब्बर खालसाकडे वळली होती. ब्लास्ट एका सानयो स्टिरिओ वापरुन केल्याचे तपासात उघड झाल्यवर तपासाची चक्रे अजुन वेगाने फिरु लागली आणि काही दिवसात ईंद्रजित सिंग रेयात याला सी.एस.आय.एस.ने Canadian Security Intelligence Service (CSIS) ब्रिटिश कोलंबिया मधुन अटक केली.

ह्या सर्वाची सुरुवात ३-६ जुन १९८४ रोजी अमृतसर येथे जे काही घडले तिथुनच झाली होती. ऑपरेशन ब्लु स्टार. त्यानंतर ४ महिन्यात इंदिरा गांधी यांची हत्या आणि शीख विरोधी दंगली याने फक्त भारतात नव्हे तर कॅनडामध्ये देखील वातावरण तंग झाले. अजितसिंग आणि परमार अमेरिका-कॅनडा येथे एकत्र आले. ह्या दोघांनी संपुर्ण कॅनडामध्ये फिरुन प्रचार करुन पैसे उभे केले आणि शीख समुदायाला भारत सरकार विरुद्ध लढण्यास उभे केले. दोघांनी काही महिन्यात २००,००० कॅनडियन डॉलर उभे केले आणि रेयातला सोबत घेउन बॉम्ब बनवायला सुरुवात केली.

१९८१ साली परमार २ पंजाब पोलिस ऑफिसर्सना मारुन कॅनडा येथे पळुन गेला होता. त्याच्या आमच्या ताब्यात द्यावे ही भारताची मागणी कॅनडाने फेटाळली होती. भारताने मग त्यावर इंटरपोल मार्फत दबाव टाकायला सुरुवात केली. १९८२ साली त्याला अवैधरित्या जर्मनीमध्ये शिरताना अटक झाली आणि १ वर्षाची शिक्षा भोगल्यावर त्याची रवानगी पुन्हा भारताऐवजी कॅनडाला केली गेली होती.

********************

अजित सिंग बाग्री (ह्याने १९८४ साली न्युयोर्क येथे झालेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय शीख परिषदेत 'हिंदुंनी कैक शिखांना नाहक ठार मारले आहे. आम्ही ५० हजार हिंदु मारत नाही तोवर शांत बसणार नाही.' असा सज्जड दम भारत सरकारला दिला होता.)

तलविंदरसिंग परमार (हा कॅनडामध्ये बब्बर खालसाचा प्रमुख होता)

लखबिरसिंग ब्रार रोडे (हा ईंटरनॅशनल सिख युथ फेडरेशन संस्था चालवत होता आणि ह्या हल्ल्या मागचा मास्टर माईंड समजला जातो). लखबिरसिंग हा जरनैल सिंग भिंद्रावाले याचा भाचा.

हरदयालसिंग जोहाल (तलविंदरसिंग परमारचा उजवा हात. विमानाचे तिकिटे ह्याचा फोन नंबर देउन बुक केली गेली होती.)

दलजित संधु

मनमोहन सिंग (तलविंदरसिंग परमारचा डावा हात. )

स्रुजन सिंग गिल. (आयत्यावेळी ऑपरेशन मधुन हात काढुन घेउन लंडन येथे पळुन गेला)

रिपुदमनसिंग मलिक

************************

रिपुदमनसिंग मलिक आणि अजित सिंग बाग्री यांना कॅनडा सरकारने २००० साली (घातपाताच्या १५ वर्षांनी) अटक केली आणि २००५ मध्ये म्हणजे ५ वर्षांनी त्यांना पुराव्याअभावी सोडुन दिले. मलिक आणि बाग्री यांनी कॅनडा सरकारवरच मानहानीचा दावा ठोकत अनुक्रमे ६.४ मिलियन आणि ९.७ मिलियन कॅनडियन डोलरची मागणी केली आहे.

ट्रायलमध्ये ईंद्रजित सिंग रेयात याने मी परमारला ओळखत नाही असे सांगितले होते पण CSIS कडे दोघांना एकत्र पाहिल्याचे पुरावे होते. मुळात परमारने रेयातला बॉम्ब बनवण्यासाठी योजले होते. ह्यानंतरही भक्कम पुरावे न मिळाल्याने CSIS कोणालाही अटक करुन ठेवु शकले नाही. रेयात कॅनडा सोडुन ईंग्लंड मध्ये निघुन गेला जिथे तो जॅग्वार कंपनीत कामाला लागला. २ वर्षांनी त्याला पुन्हा कॅनडामध्ये आणुन त्याच्यावर केस सुरु केली गेली. १९९१ मध्ये त्याला फक्त १० वर्षाची शिक्षा झाली. २००१ साली तुरुंगातुन सुटल्यावर त्याच्यावर पुन्हा केस उभी करुन त्याला ५ वर्षांकरिता पुन्हा जेल मध्ये टाकले गेले. त्याच्यावर विविध गुन्ह्यांसाठी एका मागुन एक केसेस केल्या गेल्या. गेल्या वर्षी म्हणजे ७-१-२०११ रोजी त्याला पुन्हा ९ वर्षांकरिता जेल मध्ये टाकले गेले आहे.

परमार कॅनडा मधुन गायब झाला तो कुठे गेला त्याचा पत्ता कोणालाच लागला नाही. तो पाकिस्तानात लपुन भारताविरुद्ध नव्या योजना आखत आहे अशी गुप्त बातमी १९८८ मध्ये मिळाली होती. १९९२ मध्ये अचानक पंजाबमध्ये तो पोलिस चकमकीत मारला गेल्याची बातमी आली. तो भारतात कसा आला, कधी आला, त्याला जिवंत पकडायचे प्रयत्न का केले गेले नाही याची उत्तरे अर्थात गुलद्स्त्यातच आहेत. म्रुत्युपुर्वी परमारने  Punjab Human Rights Organisation (PHRO)ला दिलेल्या एका ईंटरव्ह्युमध्ये म्हटले आहे की, लखबिर सिंग ब्रार, ईंद्रजित सिंग रेयात आणि मनजितसिंग (हे नाव वरच्या यादीतही नाहिये) यांनी कट रचला आणि २ विमानांमध्ये बॉम्ब ठेवले. लखबिरसिंग याने व्हँकुव्हर - टोकयो - बँगकॉक याचे तिकिट घेउन त्यात बॅग ठेवली तर मनजितसिंगने माँट्रेयल - लंडन - दिल्ली विमानात बॅग ठेवली.

लखबिरसिंगला १९९८ मध्ये नेपाळमध्ये २० किलो आर.डी.एक्स. बाळगल्यावरुन अटक झाली. त्यावेळी याला भारताच्या ताब्यात का घेतले गेले नाही माहित नाही पण २००१ साली तो पुन्हा पाकिस्तानात आहे याची पक्की बातमी आली. आज तो कुठे आहे याची माहिती नाही. असेही एक मत होते की हे सर्व त्यावेळच्या काँग्रेस सरकारने शीख समुदायाविरुद्ध जागतिक मत तयार व्हावे म्हणुन हे नाटक रचले. खुद्द लखबिरसिंग हा रॉ (RAW)चा अंडर कव्हर एजंट होता आणि त्याला वाचवण्यासाठी १९९२ मध्ये परमारला ठार मारले गेले.

आज २७ वर्षांनी देखील अनेक गोष्टी गुलदस्त्यातच आहेत.

बॉब म्हणतो तेच बरोबर असावे... लुक्स लाईक ईट्स ऑल डर्टी पॉलिटिक्स... 

त्या घटनेत मृत पावलेल्या सर्व ३२९ व्यक्तींना मनःपुर्वक श्रद्धांजली...


स्टॅनली पार्क, व्हँकुव्हर येथील स्मारक... म्रुत्युमुखी पडलेले बहुतेक प्रवाशी ह्या शहरातील होते.


टोरँटो येथील स्मारक...

माहिती आणि फोटो.... विकिपेडियावरुन साभार.................

31 May 2011

आपली तहान किती???


दिघेफळ... काळू नदीच्या काठावर माळशेज घाटाच्या खाली वसलेले एक छोटेसे गाव. ह्या गावाबद्दल माझ्या मनात खूप आठवणी कोरलेल्या आहेत. गावाबाहेरून नदी वाहते. नदीवर छोटासा बंधारा बांधून शेतीसाठी पाणी अडवलेले आहे. इथेच थोडे पुढे एक मस्त धबधबा आहे. पावसाळ्यात हा धबधबा मात्र प्रचंड मोठा होतो. एकावर्षी तर तो कैच्याकै मोठा झाला होता. अडकून पडलो होतो. संपर्कच तुटला होता बाहेरच्या जगापासून. पण सर्वत्र हिरवळ आणि निसर्ग सौंदर्य. समोरच्या टेकडीवर चढून नजर फिरवली की नाणेघाट, माळशेज घाट, कोकणकडा, आजा पर्वत आणि सीतेचा पाळणा अशी सह्याद्रीची रांग साद घालते. गावातला विठ्ठल आमचा जुना दोस्त. वयाने आमच्यापेक्षा २-३ वर्षे लहान. दरवर्षी आठवणीने दिघेफळला जावे, हातपंपावर हापसे मारत पाणी काढावे, चुलीवर जेवण बनवावे, नदीच्या पाण्यात डुंबावे, रात्री खेकडे पकडायला जावे, समोरच्या टेकडीवर फिरायला जावे असा एखादा निवांत दिवस आम्ही काही मित्र दर पावसाळ्यात अनुभवायचो. डिसेंबर लागला की एखादा दिवस टेंट घेऊन जावे आणि टेकडी खालच्या माळरानावर कॅम्पिंग करावे. अब्ज तारयांनी भरलेले आकाश डोळे भरून पाहावे. मग ते डोळे मिटून आठवणीत सामावून घ्यावे. पण आता हे सर्व आठवणीतच राहते की काय अशी परिस्थिती येऊन ठेपली आहे. अस्वस्थ... प्रचंड अस्वस्थ वाटतंय. मन आतून खातंय पण काही करू शकत नाही अशी परिस्थिती येते तेंव्हा अधिकच अस्वस्थ व्हायला होते.


गेल्या काही दिवसात एक बातमी वाचून मी प्रचंड अस्वस्थ झालोय. ती बातमी आहे काळू नदीवर बांधण्यात येणाऱ्या नव्या धरणाबद्दल. मुंबई शहराची वाढती तहान लक्ष्यात घेता नजीकच्या काळात माळशेज घाटाखालील मुरबाड तालुक्यातील काळू नदीवर लवकरच एक १२०० करोड रुपये खर्च करून एक धरण बांधले जाणार आहे. ह्या धरणामुळे ५० गावे पाण्याखाली जाणार असून त्यातील काही खापरी, हेदवली, करचोंडे, वैशाखरे, माळ, चासोळे, कुडशेत, झाडघर, भोऱ्हांडे, आवळेगाव, दिवाणपाडा, उदाळडोह, फांगणे, आंबिवली, खुटल, दिघेफळ, मोरोशी, फांगुळगव्हाण, न्याहाडी, जडई, तळेगाव, फांगलोशी, खरशेत अशी आहेत. ह्या ग्रामस्थांनी धरणाला प्रखर विरोध दर्शविला आहे. मुरबाडमध्ये एक शाई धरणाचे वाढीव काम सुरू असताना अजून एक काळू धरण प्रस्तावित झाल्याने तालुक्यातूनच ह्या प्रकल्पांना मोठा विरोध सुरू झाला आहे कारण निम्मा मुरबाड तालुका धरण ग्रस्त बनणार आहे. त्यांची चूक इतकीच आहे की त्यांच्या डोक्यावर आहे माळशेज घाट जिथून पाण्याचा मुबलक पुरवठा मुंबईला होऊ शकतो. पण मुंबईची तहान किती?
दररोज ३,४५० दशलक्ष्य लिटर पाणी. हा आकडा प्रचंड मोठा आहे आणि दिवसागणिक फुगत चालला आहे. ह्याला अनधिकृतपणे वाढलेल्या झोपडपट्टीची भर आहे. त्याला काहिच धरबंध राहिलेला नाही... :(

मुंबई शहरात घरासाठी आपण पाण्यासाठी किती पैसे मोजतो? दर १००० लिटर मागे फक्त  ३:५० रुपये. होय फक्त ३ रुपये ५० पैसे. खूपच स्वस्त आहे ना!!! शाळा, इस्पितळे यांना १० रुपये, तर मोठ्या हॉटेल्स आणि विमानतळ वगैरे ठिकाणी हा खर्च दर १००० लिटर मागे २५ ते ३८ रुपये असा आहे. खूपच स्वस्त नाही!!! पण हे ज्यांची जमीन जाते त्यांना किती महाग पडते हे आपल्याला कधीच लक्ष्यात येत नसते. पाण्याचा ग्लास भरून पाणी पिताना आपल्याला ह्या गोष्टीची जाणीव कधी झालेली असते का? तानसा, भातसा, वैतरणा ह्या धरणांच्या वेळी अनेक गावे विस्थापित झाली. पवना, मुळशीला तेच झाले. वैतरणा धरणाच्या वाढीचा प्रस्ताव आलेला आहे आणि त्यात शाई आणि काळू धरणामुळे अजून ५०-१०० गावे विस्थापित होतील. हे कधी थांबणार आहे का? ह्याला काही उपाय आहेत की नाही? निसर्ग संपदेचा जो र्हास होणार आहे त्याबद्दल तर बोलायलाच नको.


आपण किती जमीन पाण्याखाली घालवून, लोकांचे आणि शेतीचे नुकसान करणार आहोत हेच समजेनासे झाले आहे. खरेतर पाणी वाटप नियोजन व्यवस्थित नसल्याने, १०० हून अधिक वर्ष जुनी वाहक यंत्रणा असल्याने दरवर्षी जवळ-जवळ अर्धे पाणी वाया जाते. हे असे १२०० करोड वगैरे जुनी पाईप्स किंवा उदंचन केंद्रे वगैरे नीट करण्यावर खर्च केले तर वाया जाणारे पाणी वाचवता येईल आणि नवीन जमीन संपादन करून हे असले नवे प्रश्न उभे राहणारच नाहीत. शिवाय शहरात राहणाऱ्या प्रत्येकाने पाण्याचा वापर नीट केला तरी परिस्थितीत बराच फरक पडू शकेल. प्रामाणिकपणे सांगा आपल्यापैकी कितीजण सूचकपणे विचार करून पाणी वापरतात? मुंबई मध्ये अनेक नैसर्गिक जलस्त्रोत आहेत. पण सध्या त्या विहिरी, तळी बंद पडलेल्या आहेत. खूपच कमी ठिकाणी वापरात असतील बहुदा. पावसाचे पाणी साचवून (Harvesting)  भूजल पातळी सहज वाढवता येईल. पण नाही... सर्व प्रश्न राजकीय इच्छा शक्ती नाही इथेच येऊन थांबात का? आपण स्वतः देखील असे बरेच काही करू शकतो. पाण्याची मागणी कमी झाली तर अश्या प्रकल्पांची गरज भविष्यात भासणार नाही.


मुंबई आणि उपनगरे ह्या भागाला पाणी पुरवठा करणारे अनेक जलस्त्रोत आहेत. खुद्द मुंबईमधले मिठी नदीवर बाधलेले तुलसी आणि विहार काही प्रमाणात मुंबईची तहान भागवतात. पण ते ३० वर्षांपूर्वी ठीक होते. सध्याच्या वाढीव लोकसंख्येला ते पुरून उरले नसतेच. पवई लेक मधील पाणी आता पिण्यासाठी वापरले जात नाही. ठाणे जिल्ह्यातील तानसा, अप्पर वैतरणा, लोवर वैतरणा (मोडक सागर), भातसा असे जलस्त्रोत आहेत. ह्यातही तानसाचे ४ विभाग, भातसाचे ३ विभाग आणि वैतरणाचे ३ असे उप वर्गीकरण आहे. ह्यात आता शाई आणि काळू धरणाची भर पडणार आहे. अजूनही उल्हास नदीवर लोणावळा पासून कोठेही धरण नाही. पण बहुदा मुंबई - पुणे रेल-वे मार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग जवळ असल्याने त्यावर धरण बांधण्याची योजना आखली गेली नसेल.

मुळात धरणामधून शुद्ध करून आलेले पाणी सरसकट प्रत्येक गोष्टीसाठी वापरले जाते आहे. पिण्यासाठी तर हवेच पण कपडे-भांडी धुताना, गाड्या धुताना, इतर कामांसाठी कशाला हवे हे मौल्यवान पाणी? बरे वापरले गेलेले हे पाणी सरसकट खराब असते का? उत्तर नाही असे आहे. त्यावर शुद्दीकरणाची प्रक्रिया करून त्यातील ८० टक्के पाणी इतर कामांना वापरता येऊ शकते. असा एक प्लांट मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस मध्ये कार्यरत आहे. स्टेशनचे सर्व फलाट आणि येणाऱ्या गाड्या धुण्यासाठी १९९९ मध्ये अवघ्या २४ लाख रुपयात हा प्लांट उभारला गेला. ह्यातून दररोज २ लाख लिटर पाणी शुद्ध केले जाते आणि स्टेशन परिसरात विविध कामांसाठी वापरले जाते.



शिवाय समुद्रातील खारे पाणी गोडे करून देखील वापरता येऊ शकते. बी.ए.आर.सी. मधील एक तंत्रज्ञ अरविंद देशमुख यांनी ह्या संदर्भात एक रिपोर्ट सादर केला होता. त्यात त्यांनी अवघ्या १५ करोड रुपयात असा १ प्लांट उभा करून दररोज २० दशलक्ष्य लिटर इतके पाणी शुद्ध करता येईल ह्याकडे लक्ष्य वेधले होते. असे प्लांट उभे केले तर भविष्यातील आपली पाण्याची गरज वाढली तरी त्याचा भार इतरस्त पडणार नाही आणि त्यामुळे अनेकांचे नुकसान होण्याचे टाळू शकेल. पण सध्यातरी ते अशक्य वाटतंय. म्हणजे २-३ वर्षात इथे धरण झाले की आपण मुरबाड वरून माळशेजला जाताना एक सुंदर धरण आपल्या डाव्या हाताला दिसत राहील. अप्रतीम निसर्ग वगैरे उपमा देत आपण फोटो देखील काढू... पण मुळात ज्यांची घरे जमीन अशी मालमता जाणार आहे ते मात्र तलासरीच्या एका कोपरयात कुठेतरी खितपत आयुष्य जगत असतील.


विठ्ठलसारख्या अनेकांची शेत जमीन जाणार आहे. अगदी घरासकट. तो आता ठाणे महानगर पालिकेत नोकरी मिळावी म्हणून प्रयत्न करतोय. मोठ्या मुलीला तिच्या मामाकडे म्हश्याला ठेवलंय. लहान मूलाला सुद्धा तिथेच पाठवेल बहुदा. स्वतः ठाण्यात राहायला येईल. तलासरीला जाणार नाही म्हणतो. इथे नोकरी करण्यासाठी राहील पण त्याला कुठे परवडणार आहे ठाण्यात घर घ्यायला. म्हणजे कुठल्याश्या झोपडपट्टी सदृश्य खुराड्यात राहील तो?
त्याच्या मुलांचे हे हसू तसेच राहील का? हे सर्व आता मला अस्वस्थ करायला लागलंय. आधी इतकी वर्षे हेच होत आलंय.  आज फक्त त्याची दाहकता जवळून जाणवते आहे इतकंच. मी काय करू शकीन? मुंबईत आलो की विठ्ठलला भेटीन. जमेल ती मदत करीन. पण आपण काय करू शकतो ह्याच्या मर्यादा आपल्यालाही ठावूक असतात... मग फक्त अस्वस्थ व्हायचे... प्रचंड अस्वस्थ... दुसरे काय!!!

6 May 2011

नक्षत्रवन ...

प्रत्येक चांगल्या गोष्टीला अंत असतो असे म्हणतात. खरंय ते, नाहीतर माझी इतकी मोठी सुट्टी संपली असती का.. अखेर मी पुन्हा कामावर रुजू झालोच. गेल्या ३ महिन्यात (साडेतीन.. उगाच खोटे कशाला बोला) मस्तपैकी आराम झाला. तसे थोडे फिरणेही झालेच. मार्च महिन्यात कोकणात थोडी भटकंती झाली तेंव्हा गुहागर आणि दापोलीला गेलो होतो. दापोलीला ते कृषी विद्यापीठ आहे ना तिथे. तिथे त्यांच्या वनशास्त्र महाविद्यालयाचे नक्षत्रवृक्षांचे वन पहिले. मस्त आहे. बरीच माहिती नव्याने मिळाली.

मला तर ठावूकच नव्हते की प्रत्येक नक्षत्राचा एक स्वामी वृक्ष असतो. प्रत्येकाने स्वतःच्या राशी नक्षत्राचे झाड लावावे, त्याचे पूजन करावे आणि सानिध्यात राहावे असे म्हटले जाते. तिथे दिलेल्या माहितीप्रमाणे २७ नक्षत्रांचे स्वामी वृक्ष खालीलप्रमाणे...

मृगशीर्ष -  खैर
पुनर्वसू - वेळू उर्फ बांबू
आद्रा - अर्जुन
रोहिणी - जांभूळ
आश्लेषा - नागचाफा
पुष्य - पिंपळ
पूर्वा - पळस
मघा - वड
हस्त - जाई
उत्तरा - पायरी
चित्र - बेल
अनुराधा - केवडा
स्वाती - अर्जुन
मूळ - साल
जेष्ठा - सावर
पुर्वाशाढा - वेत
श्रावण - रुई
धनिष्ठा - शमी
शततारका - कदंब
पूर्व भाद्रपदा - आंबा  
उत्तर भाद्रपदा - कडूनिंब
रेवती - मोहं
अश्विनी - कुचला
भरणी - आवळा
कृतिका - उंबर
पूर्व फाल्गुनी - पळस
विशाखा - नागकेशर

ही सर्व झाडे विद्यापीठात विक्रीसाठी पूर्णवेळ उपलब्ध असतात. तर मग कधी वृक्षारोपण करताय आपल्या नक्षत्राच्या स्वामीवृक्षाचे??? वाढदिवसाला गिफ्ट काय देऊ असा विचार येणाऱ्या लोकांना एक चांगला पर्याय आहे... नाही का!!! तेवढंच वृक्षारोपणाचे सत्कर्म... :)

28 Jan 2011

२ वेगवेगळ्या डायरीज ... धोबीघाट आणि 127 Hours ...

काल एका दिवसात २ वेगवेगळ्या डायरीज बघायचा, अनुभवायचा योग आला. एक तर अमीरखान आणि किरण रावचा बहुचर्चित धोबीघाट - मुंबई डायरीज आणि दुसरा म्हणजे 127 Hours. धोबीघाट ९५ मिनिटांचा तर 127 Hours ९४ मिनिटांचा. एक डायरी मुंबईमधल्या ४ माणसांची तर दुसरी अमेरिकेतल्या कॅनियोन मधली ऍरॉन रालस्टनची.

धोबीघाट -
धोबीघाट ही अरुण (अमीर खान) - आरटिस्ट, मुन्ना (प्रतिक बब्बर) - धोबी आणि उंदीर मारणारा कामगार, शाय (मोनिका डोग्रा) - इन्वेस्टमेंट बँकर व फोटोग्राफर आणि यास्मिन (क्रिती मल्होत्रा) ह्या ४ व्यक्तिमत्वांची कथा आहे. ह्या चौघांची आयुष्य एकमेकांशी कशी गुंतलेली असतात हे ह्या लघुपटात सशक्तपणे(?) मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ह्यामध्ये मुन्ना हे मुख्यपात्र असे कुठेही वाटत नाही. अरुणचे पात्र हे सर्वात मुख्य असून ते इतर तिघांशी ह्या ना त्या कारणाने जोडलेले आहे. मुन्ना आणि शाय यांचा संबंध देखील अरुण बरोबर येतो. पण यास्मिनचा संबंध फक्त अरुण बरोबर येतो आणि तो ही थेट नाही. अमीर खानने आरटिस्ट म्हणून अरुण व्यवस्थित रंगवलेला आहे. पण संपूर्ण चित्रपटात त्याच्या थोड्या विचित्र वागण्याचे कारण नीटसे समजून येत नाही. दर काही महिन्यांनी घर बदलत राहणारा अरुण मुन्नाला मात्र त्याच्या प्रत्येक नव्या घराचा पत्ता द्यायला विसरत नसतो. कारण मुन्ना असतो धोबी. धोबीघाटावर कपडे धुवून ते तो अरुणला आणून देत असतो. प्रतिक बब्बरकडून अभिनया बाबतीत अनेक अपेक्षा होत्या. किमान माझ्यातरी होत्या. मात्र त्याचा अभिनय सशक्त वाटत नाही. तसा तो त्याच्याकडून करवून घेतला आहे की काय अशीही शंका येते. संपूर्ण चित्रपटात २-३ मोजके क्षण सोडले तर धोबीघाटाचा नामोनिशाण नाही. चित्रपटाला धोबीघाट ऐवजी थेट मुंबई डायरीज असे इंग्रजी नावच नाव योग्य ठरले असते. ह्याचे अजून एक कारण म्हणजे चित्रपटात असलेले इंग्रजी संवाद. घेतलेल्या तिकिटावर पार्शियली इंग्लिश असे लिहिलेले असताना हा चित्रपट पार्शियली हिंदी आहे की काय असा प्रश्न पडावा. अरुण आणि शाय ह्यांचे सर्व संवाद इंग्रजीमध्ये आहेत. शाय अमेरिकेत राहते आणि ब्रेक म्हणून ती मुंबईला आली आहे. तिला मुंबईची काही भाग बघून त्याचे फोटो काढायचे आहेत. तिचे हिंदी व्यवस्थित आहे. मुन्नाबरोबर तो हिंदीमध्ये बोलते मात्र अरुण बरोबर पूर्ण इंग्रजीमध्ये. असे का? यास्मिनची कहाणी फक्त टी.व्ही. मधून अरुणला दिसत राहते आणि त्यावर अरुणची मनस्थिती बदलत जाते.




अवघ्या ९५ मिनिटांमध्ये कथा बांधायचा हा प्रयत्न तितका प्रभावी ठरत नाही. कथा सुरवातीला बरीच आणि मध्ये थोडीफार त्रोटक वाटते. शेवटी प्रत्येकाच्या आयुष्यात येणारे काही क्षण त्यांना एका धाग्यात बांधायचा प्रयत्न करतात पण तोपर्यंत चित्रपट आपल्याला भावलेला नसतो. ते क्षण कोणते हे प्रत्येकाने बघणेच योग्य ठरेल. चित्रपटात काही दृश्ये मुंबईचे जीवन मान दर्शवतात. मुन्नाने चालत्या रेल्वे शेजारी अंघोळ करणे, जुन्या वस्त्यांमधून फिरणे हे मुंबईमध्ये राहिलेल्या आणि मुंबई पाहिलेल्या लोकांसाठी काही नवीन नाही. चित्रपट फक्त प्रौढासाठी आहे ह्याचे कारण त्यात वापरलेल्या काही इंग्रजी शिव्या. एक नवीन प्रयोग म्हणून जरी धोबीघाटकडे पहिले तरी धोबीघाट किमान एकदा बघण्या लायकीचा(?) आहे की नाही हे प्रत्येकाने बघूनच ठरवावे लागेल...


127 Hours -

127 Hours ही कथा आहे ऍरॉन रालस्टन याच्या आयुष्यावर. जेम्स फ्रांको याने ऍरॉन रालस्टन याची भूमिका १०० टक्के तंतोतंत उभी केली आहे असेच चित्रपट पाहिल्यावर म्हणावे लागते. ऍरॉन रालस्टनचे व्यक्तिमत्व जेम्स फ्रांकोच्या रूपाने आपल्यासमोर अवघ्या ९४ मिनिटांमध्ये उभे राहते. नव्हे ते भिडते आणि आपल्याला आतून अस्वस्थ करत जाते. विकेंडला पार्टीज पेक्षा डोंगरात रमणारा ऍरॉन अर्ध्या अधिक वेळा उटाह मधील कॅनियोन मध्ये पडीक असतो. तिथला बराच भाग त्याचा आवडीचा. 'ब्लू जॉन कॅनियोन' हा त्याच्या विशेष आवडीचा. तिथे चिमणी क्लाइम्ब (प्रस्तरारोहणाचा एक प्रकार) करत खालच्या निळ्याशार पाण्यात उड्या घेणे हा त्याचा आवडता उद्योग. अश्याच एका विकेंडला तो एकटाच रात्री सामान भरून निघतो आणि कॅनियोनमध्ये जातो आणि मग घडते एक थरारनाटय. हे त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारे ठरते.


तो निघताना आईचा फोन घेत नाही, सामान भरताना नेमके स्विस नाईफ विसरतो आणि चायना मेड मल्टी टूल मात्र घेऊन जातो, कुठे जातोय ते मित्राला सांगत नाही. इथेच त्याने डोंगरातला पहिला नियम मोडलेला असतो. आपण एकटे जाताना नेमके कुठे जातोय हे कोणा ना कोणाला तरी सांगणे किती आवश्यक असते ते चित्रपटाचा शेवटी समजते. शनिवारी बाईकिंग करत तो पुढे हायकिंग करत निघतो आणि वाटेत मेगन व क्रिस्टी या २ मुलींना भेटतो. त्यांना तो त्याची आवडती ब्लू जॉन कॅनियोन मधील जंप दाखवतो. हा सीन जबरा आहे. एकदम जबरदस्त... पुढे त्या दोघींना टाटा करत कॅनोयोन मधून पुढे जाताना एका लूस बोल्डरवर त्याचा अपघात होतो आणि तो बोल्डर (दगड) त्याच्या उजव्या हातावर पडून त्याचा हात अतिशय वाईटरित्या अडकतो. पुढे त्याचे काय होते ते बघणेच योग्य ठरेल. ५ दिवस (१२७ तास) तश्या अवस्थेत तो काय करतो, सुटण्यासाठी तो काय काय धडपड करत राहतो, त्याला काय काय भास-आभास होतात हे अत्यंत सक्षमरित्या चित्रपटात मांडलेले आहे. मानवी मन संकटात कसे खेळ खेळते नाही!!! ते चित्रपटात बघणेच योग्य ठरेल. सर्वच इथे सांगितले तर बघण्याची उत्सुकता निघून जाईल.

५ दिवस स्वतः:ला Dont Give Up... Dont Loose your Mind ...  सांगणारा ऍरॉन, अन्न नाही, पाणी संपत आलेले तरी सुद्धा जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती असलेला ऍरॉन, एक अत्यंत धाडसी निर्णय घेतो. तो म्हणजे स्वतःचा हात शरीरापासून कापून टाकण्याचा. हे मुख्य कथानक इथे लिहिले तरी ते बघताना तितकेच हृदयद्रावक असते. दगडाखाली अडकलेल्या उजव्या हाताचे हाड तो आधी स्वतः मोडतो. ए.आर.रेहमानने जबरदस्त साऊंड इफेक्ट्स इथे दिलेले आहेत. नंतर सोबत असलेल्या निकृष्ट दर्जाच्या चायना मेड मल्टी टूलने तो सर्व रक्तवाहिन्या आणि मसल्स कापून काढतो. अखेर १२७ तासांनी त्याची तिथून सुटका झालेली असते. मृत्यूवर त्याने विजय प्राप्त केलेला असतो.


 ऍरॉन रालस्टन...

चित्रपटाच्या शेवटी लिहिलेल्या २ ओळी चित्रपटाचे सार सांगून जातात. एक म्हणजे ऍरॉन एका पक्क्या भटक्या प्रमाणे आजही जगभरात माउंटेनेरिंग आणि क्लाइम्बिंग करतो. अगदी कॅनियोन मध्ये सुद्धा. आणि दुसरे म्हणजे तो कुठे जातोय याची माहिती तो घरी सोडून जातो. डोंगरातले नियम मोडण्याची चूक तो पुन्हा आयुष्यात करेल असे वाटत नाही. ऍरॉनने केलेल्या धाडसाला, त्याच्या इच्छाशक्तीला खरोखर सलाम... आता ह्या प्रसंगावर त्याने स्वतः लिहिलेले पुस्तक वाचायचे आहे. त्याच्या ह्या धाडसाबद्दल अजून वाचायचे आहे...




काल पाहिलेल्या २ डायरीज... भिन्न तरीही परिणाम साधलेल्या... नकळत तुलना होतेच. 127 Hours धोबीघाटला खूप मागे टाकून पुढे निघून गेला. कदाचित माझ्या डोंगरप्रेमाचा तो परिणाम असावा...


सर्व छायाचित्रे आंतरजालावरून साभार...  

19 Jan 2011

सर.. तुमची दिल्ली दाखवा ...

हा ब्लॉग सुरू करायचे अनेक महिने मनात असले तरी आत्ताच हा ब्लॉग सुरू करायचे कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी आकाने (आनंद काळे) सुरू केलेला एक बझ. सर्वांचे लहानपणीचे किस्से ऐकून अनेक दिवसांनी मनमोकळेपणाने पोट दुखेपर्यंत हसलो. तेंव्हाच ठरवले एक ब्लॉग सुरू करायचाच. त्यावर मी माझ्या शालेय जीवनातला एक छोटासा किस्सा टाकला होता तो इथे पुन्हा सविस्तरपणे मांडतोय.



साल १९९८... माझे दहावीचे वर्ष.. पहिल्या की दुसऱ्या चाचणी परीक्षेचे पेपर तपासून हातात पडलेले. त्यातला भूगोलाचा पेपर मी अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने पुन्हा पुन्हा तपासून बघत होतो. भूगोल माझा तसा आवडीचा विषय. लक्ष्यात आले की भूगोलाच्या शिक्षकांनी माझ्या एका बरोबर उत्तराला चूक देऊन गुण दिले नव्हते. भारताच्या नकाशामध्ये 'दिल्ली'चे भौगोलिक स्थान दाखवा असा तो प्रश्न होता. येत्या भूगोलाच्या तासाला शिक्षकांना ह्याबद्दल विचारायचे असे मी ठरवले होते. शिक्षक आल्यावर ज्यांचे गुण मोजण्यात किंवा देण्यात चूक झाली होती अशी २-३ मुले-मुली पुढे गेल्या. मी त्यात सर्वात शेवटी होतो. सर्वांचे समाधान झाल्यावर शिक्षकांनी मला विचारले,'चौधरी. काय झाले?'

मी : सर. मला एका प्रश्नाचे मार्क दिलेले नाहीत. हा बघा.
सर : कुठला रे.. बघू. हा? अरे चूक आहे ते.
मी : सर ते चूक कसे? दिल्ली तर इथेच आहे ना.
सर : नाही रे. दिल्ली बघ इथे आहे.. (सरांनी हरियाणामध्ये कुठेतरी बोट ठेवत सांगितले.)
मी : सर. दिल्लीतर हरियाणा आणि उत्तरप्रदेशच्याबरोबर मध्ये आहे. भूगोलाच्या पुस्तकात तसेच दाखवले आहे.
सर : कुठले पुस्तक वापरतोस तू? माझ्या पुस्तकात दिल्ली ही बघ इथे आहे. (सरांनी हरियाणामध्ये पुन्हा तिथे बोट ठेवत सांगितले)


(मला विनाकारण सरांशी वाद घालायचा नव्हती पण... शेवटी तत्वनिष्ठ माणूस मी... :D सरांना बोललोच...)
मी : सर.. तुमची दिल्ली दाखवा..

आता मात्र सर उडाले. वर्गात सर्वत्र हशा. काही मुले-मुली आपापसात कुजबुजू लागले.


सर : तुझ्या अश्या वर्तनाबद्दल मी तुला मुख्याध्यापकांकडे घेऊन जाऊ शकतो.
मी : हरकत नाही सर. पण बरोबर आहे त्याचे गुण मला मिळायलाच हवेत.
(हवंतर तिकडे जाऊन दिल्ली दाखवा - हे मनात)

पुढे काय... मला माझे गुण मिळाले.. तब्बल २ गुण... माझ्यासारख्या इतिहास आणि भूगोलात आवड असलेल्या विद्यार्थ्याने दिल्ली चुकावी??? ... असाच अजून एक दीड गुणाचा किस्सा अजून एका शिक्षकाबरोबर त्याच वर्षी झाला. तो पुन्हा कधीतरी..

आत्ता मात्र काम आटोपून उडायची तयारी करतोय... :) सुट्टीवर घरी पळतोय. लवकरच भेटू एखादा मजेशीर किस्सा घेऊन.. :)

15 Jan 2011

मी घडलो... बिघडलो...

बऱ्याचदा निवांत बसलेलो असताना अचानक कुठूनशी एखादी आठवण येते आणि मन सैरभैर करून जाते. हो नं.. आठवणी आल्या की त्या काय सहजासहजी थोडीच थांबतात. एकामागून एक अश्या येतच जातात आणि मग निर्माण करून ठेवतात मनावर एक ठसा. पुन्हा एक नवीन आठवण. आयुष्यात प्रत्येक क्षणी आपल्यासमोर आलेल्या प्रसंगांच्या आठवणींची एक-एक पानं आपण जपून ठेवतो आणि मग ते एक-एक पान हळुवारपणे आपण उलगडू लागतो. लहानपणापासून आपण जिथे वाढलो, लहानाचे मोठे झालो, आपले आई-वडील, आपले पहिले राहते घर, आपली शाळा, लहानपणीचे मित्र - मैत्रिणी, प्रेम, आयुष्यात आलेला तो प्रत्येक क्षण आपण भरभरून जगलेलो आहोत हे आता आपण मोठे झाल्यावर हळूहळू लक्ष्यात येते. मग आपण आठवणी जागवू लागलो. लहानपणी भरभर मोठे व्हायचे असते आणि मोठे झालो की 'लहानपण देगा देवा' म्हणत आपण दिवस काढतो...

अश्याच काही आठवणी मी आता ह्या ब्लॉगद्वारे तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे. ह्यात सर्व काही असेल... माझे लहानपणीचे धमाल किस्से असतील. कैच्याकै लिखाण असेल, आवरा लिखाण पण असेल, धमाल - मज्जा - मस्ती असे सर्व-सर्व असेल. सोबत माझी विविध विषयांवरील मते असतील जी मी आत्तापर्यंत मांडायचे टाळत आलोय. शुभेच्छा असतील, खादाडी असेल आणि विचारमंथन पण असेल.. माझ्या आयुष्यावर प्रभाव सोडून गेलेल्या, भावलेल्या व्यक्तींचे चित्रण असेल, एखादी कथा किंवा ललित आलेच तरी दचकू नका हा.. :)


ह्या सर्व अनुभवांमधून मी थोडा घडलोय... आणि थोडा बिघडलोय... शेवटी आयुष्य म्हणजे काय.. 'परिपूर्णतेकडे चालू अस
लेली एक वाटचाल'. हा ब्लॉग सुद्धा त्याचाच एक भाग असे समजून पुढे सरकतोय... मला खात्री आहे आजवर माझ्या इतिहास आणि भटकंती लिखाणाला जसा प्रतिसाद आपण दिलात तसाच प्रतिसाद आत्ता सुद्धा द्याल.


तुम्हा सर्वांवर लोभ आहेच तो वृद्धिंगत व्हावा हीच इच्छा... 
 

शुभेच्छापत्र आलेल्या विरोपातून साभार..